"ती"ला कमी लेखू नका.."



         या विषयावर यापूर्वी कधी भाष्य केलं गेलं नाही, अशातला भाग नाही... मात्र तरीदेखील पुन्हा - पुन्हा का या विषयांवर बोललं जातं, लिहिलं जातं, याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. लॉकडाऊन झाल्यापासून आपण सर्वजण घरीच आहोत आणि आपल्यातील अनेकांना हे जाणवले की आपण रोज काम करत असतो, आपल्याला आठवड्यात काही सुट्ट्या तरी मिळतात, मात्र आपल्या घरातील स्त्रियांना कधीच सुट्टी मिळत नाही. वर्षाचे बारा महिने रात्रंदिवस ती निस्वार्थपणे कोणताही मोबदला न घेता काबाडकष्ट करत असते. सोशिकपणा तिच्या ठायी ठायी भरलेला असतो, तरीही आपण तिची योग्य ती दखल घेत नसतो. उलट ती आपल्या लेखी दुय्यम असते व आपण तिची सतत उपेक्षाच करतो आणि हे अनादीकालापासून चालू आहे. शिक्षण घेणेअसो किंवा मग नोकरी, व्यवसाय करणे असो.
सुरुवातीच्या काळामध्ये स्त्रियांनी फक्त "चूल आणि मूल" सांभाळायचे,असा अलिखित नियमच होता. विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत अशीच स्थिती होती. त्याकाळी स्त्रियांना शिक्षण घेऊ दिलं जात नसे. अशा पुरुषप्रधान व्यवस्थेमध्ये एक क्रांतीची ज्योत पेटली, तमाम स्त्रीयांच्या जीवनात उष:काल झाला. सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी संघर्ष सुरू केला. समाजात बदल घडण्यासाठी क्रांतीच करणे आवश्यक नसते. प्रत्येकाने आपले विचार प्रगल्भ व समाज सुधारणेच्या दृष्टीने सकारात्मक भूमिका घेतली तर समाजातील उपेक्षित घटकांचे वर्तमान व भविष्य उज्ज्वल होऊ शकते.
घर असो किंवा मग नोकरीचे ठिकाण ती "स्त्री" आहे, तिला हे जमेल का? ती हे करू शकेल का? असे अनावश्यक प्रश्न उपस्थित करण्यात येतात. याउलट एक स्त्री सर्व काही करू शकते, यावर भर दिल्यास, ती स्त्री  जीवनाच्या मुख्य प्रवाहात नक्कीच सामील होऊ शकते. स्त्री हालअपेष्टा, काबाडकष्ट करत आई, बहिण, पत्नी व सून, अशा अनेक भूमिका पार पाडत कौटुंबिक जबाबदारी सहजपणे पेलत असते. कुटुंबात एखादी वाईट गोष्ट घडली तर तिलाच दोष दिला जातो. कामाच्या ठिकाणी देखील हीच अवस्था आहे. महिलाना अनेकदा वाईट नजरेने पाहिले जाते मग विवाहित असो नाहीतर अविवाहित...
रोजगार क्षेत्रात पुरुषापेक्षा स्त्रियांची संख्या अल्प आहे,हे आजवर झालेल्या सर्वेक्षणातून उघड झाले आहे. कुटुंबव्यवस्थेत बदल होत असताना यातही बदल झाला पाहिजे.तरच खऱ्या अर्थाने महिलांचे सक्षमीकरण होईल.कुटुंबाचे भले व्हावे,आपल्या मुलाबाळांना चांगले शिक्षण मिळावे,त्यांना आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये,यासाठी स्त्रियां सतत तडजोड करत असतात.त्यासाठी त्या आपल्या आरोग्याची पण तमा बाळगत नाहीत.पण तिच्या या त्यागाची योग्य ती दखल घेतली जात नाही.
मात्र आता एकविसाव्या शतकात हळुवारपणे का होईना, पण बदल होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक क्षेत्रामध्ये आता महिला उच्चपदी काम करताना पाहायला मिळतात. आता "स्त्री" ही अबला राहिली नाही, तिचा निर्णयप्रक्रियेत असलेला सहभाग उल्लेखनीय असा आहे. ती आता मागे राहिलेली नाही, व मागे राहू इच्छितही नाही. आता पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, अंतराळवीर कल्पना चावला, टेनिसपटू सानिया मिर्झा, बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, धावपटू पी.टी.उषा, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, अशा कितीतरी महिला आहेत, ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने समाजात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. महिला विविध क्षेत्रात कार्यरत आहेत, परंतु पुरुषांपेक्षा महिलांची संख्या वीस टक्के इतकीच असल्याचे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.
तिच्यातील क्षमता न ओळखता केवळ ती एक "स्त्री" आहे.तिला हे काम जमेल का ? यावर तिचे भवितव्य ठरवले जाते, ते कितपत योग्य आहे ? याचा विचार समाजाने करायला हवा. जुन्या काळी असलेल्या बुरसट विचारांचा त्याग करून स्त्रियांना आसमंत मोकळे मिळाले तर खऱ्या अर्थाने आपण समाजवाद अंगिकारला, यावर शिक्कामोर्तब होईल.
हिंदवी स्वराज्य स्थापनेचे बाळकडू  छत्रपती शिवाजी महाराज यांना देऊन तसे संस्कार करणाऱ्या राजमाता जिजाऊ, घरातील माणसांच्या मृत्यूचे दुःख बाजूला सारून राज्यकर्त्याच्या भूमिकेतून प्रजाहिताची कामे करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर,
पती निधनानंतर शहेनशहा अकबराच्या सैन्याला टक्कर देणारी राणी दुर्गावती, तसेच चांदबीबी, झाशीची राणी यांचे अतुलनीय युद्धकौशल्य,
लहानपणापासून आकाशात भरारी मारण्याचे पाहिलेले स्वप्न साकार करणारी कल्पना चावला, सुनिता विल्यम्स, कर्मठ सामाजिक वातावरणात वैद्यकिय शिक्षण घेऊन पहिली महिला डॉक्टर झालेल्या आनंदी गोपाळ जोशी, जगाला दुःखातून बाहेर काढून आनंद वाटणाऱ्या माता अमृतानंदमयी, महिला शिक्षणासाठी झटणाऱ्या सावित्रीबाई फुले, पती बाबा आमटे यांच्याबरोबरीने कुष्ठरोग्यांची सेवा करणाऱ्या साधना आमटे अशा अनेक प्रेरणादायी व्यक्तीमत्व म्हणजे,महिलांच्या कर्तुत्वाची साक्ष आहेत.. म्हणून "ती" ला कमी लेखू नका ...

-रामेश्वरी आहेेर.

Comments

Popular posts from this blog

पहिल्या शेतकरी आत्महत्येला ३५ वर्षे पूर्ण तरी...

'ती ' ची सत्ता येऊ द्या...

मैत्री...