'ती ' ची सत्ता येऊ द्या...

- रामेश्वरी आहेर.
 
राजकारण आणि महिला हा विषय काही आपल्यासाठी नवीन नाही. कायमचं या विषयावर भाष्य करण्यात आलं आहे. आज महिला दिनाच्या निमित्ताने याबाबत बोलावसं वाटतं आहे. फार पुर्वीपासुन महिला राजकारणात सक्रिय असण्याचे पुरावे आपल्याला इतिहासात आढळुन येतात. महिलांचा केवळ सहभाग नसुन त्यांची निर्णय प्रक्रिया, राजकीय व सामाजिक चेतना प्रफुल्लित करण्यामध्ये मोलाचे योगदान आहे. 
इसवी सन बाराव्या शतकानंतर राजकारभाराची सुत्रे महिलांच्या हाती गेल्याचे आपण पाहतो. अवघ्या तेराव्या वर्षी लढलेली रझिया, गोंडवाना संस्थानची महाराणी दुर्गावती, १६व्या शतकात चांदबिबी अशा अनेक महिलांची नावे इतिहासात कोरली गेली आहेत. त्यानंतर सतराव्या शतकात प्रत्यक्ष राज्यकारभार न करता राजकारणाला नवी दिशा दाखवणाऱ्या राजमाता जिजाऊ. जिजाऊनंतर ठळकपणे दिसणारे नाव म्हणजे महाराणी ताराबाई. इसवी सन १७६६ ते १७९५ या काळात आपल्या कार्याने झळाळुव उठल्या त्या म्हणजे अहिल्याबाई होळकर. 
स्वांतत्रोत्तर काळात भारतीय राजकारणात स्त्रीयांचा मोठा सहभाग मिळाला आहे. ज्या समाजातील तळागाळातील स्त्रियांकरिता प्रेरणादायी ठरल्या. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, काँग्रेस पक्षाचे नेतृत्व सांभाळणाऱ्या सोनिया गांधी, ममता बॅनर्जी, मायावती, जयललिता, सुषमा स्वराज, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील, सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे, या व अशा अनेक स्त्रियांनी राजकारणात आपला ठसा उमटविला आहे. या महिलांनी समाजातील विविध समस्यांचे निवारण करण्याचा प्रयत्न कायम केला आहे व समाजाला त्या विकासाची वाट दाखवत आहे. मन ते स्वच्छतागृहे, बचतगट, महिला सुरक्षितता, स्त्रीभ्रुणहत्या, महिला अत्याचार, दारुबंदी अशा अनेक समस्या सोडविण्याचे काम चालुच आहे. स्वतःच्या हक्कासाठी, समाजाच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यासाठी देखील महिला डगमगल्या नाहीत. 
स्त्री ही अबला नारी नाही किंवा फक्त घरात काम करणारी नाही, उपभोगाची वस्तू देखील नाही तर, एकाच वेळी आपलं कुटूंब, नाती आणि समाजात बदल घडवून आणणारी शक्ती आहे. आपल्याकडे स्त्री-पुरुष समानता आहे असं म्हणतात, मात्र खरचं तसं आहे का? खरचं समानतेची वागणुक महिलांना समाजात मिळते का? आज कोणत्याच क्षेत्रात स्त्रिया मागे नाही. तिच्यामध्ये कोणतीही गोष्ट करण्याची जिद्द आणि धमक आहे. बऱ्याचदा आपली बॉस एखादी स्त्री कशी असू शकते, ती आपल्याला सुचना कशी देऊ शकते अशा विचारांची लोक स्त्रियांना पुढे जाऊ देत नाही. 
पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये महिलांना पाठिंबा मिळाल्यावरच त्यांना पुढे पाऊल टाकता येते. वास्तविक पाहता अनेक क्षेत्रात भरारी मारत असताना आजही अनेक समस्या सुटलेल्या नाही. विशेषतः ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांना अनेक असुविधांना सामोरे जावे लागते. ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद अशा ठिकाणी आरक्षण पद्धतीमुळे महिलांना राजकारणात प्रतिनिधित्व मिळु लागलं आहे. राजकारणात टिकून राहण्यासाठी त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. हळुहळु परिस्थिती बदल्याचे दिसते मात्र, पुर्ण परिस्थिती बदल्यास किती वेळ लागेल हे सांगणे कठिण आहे. 
लोकसंख्येच्या मानाने महिलांचा राजकारणात तितका सहभाग नाही. राजकारणात जितक्या जास्त महिला येतील, तितका प्रशासनाचा कारभार पारदर्शक होईल, शासन व्यवस्थेला भ्रष्टाचाराची लागलेली किड संपवता येईल. 
महाराष्ट्रात अनेक पक्ष, आम्ही महिलांना प्राधान्य देतो असे सांगतो, मात्र वास्तव वेगळे आहे. केवळ दाखवण्यासाठी महिलांना पुढे केले जाते. निर्णय मात्र तिला घेऊ दिले जात नाही. सध्या राजकारणात असणाऱ्या अनेक महिला या राजकारणी घराण्यातून पुढे आलेल्या आहेत. मात्र, राजकीय पाश्र्वभुमी नसणाऱ्या माहिलांना देखील राजकारणात उतरण्याची संधी मिळणं आवश्यक आहे. 
महिलांमध्ये प्रामाणिकपणा व मेहनत करण्याची तयारी उपजत असल्याने या गुणांवर महिलांनी आज विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. जिच्या हातात पाळण्याची दोरी, तिच्या हातात सत्ता दिली तर, परिवर्तन होण्यास वेळ लागणार नाही.

Comments

Popular posts from this blog

पहिल्या शेतकरी आत्महत्येला ३५ वर्षे पूर्ण तरी...

भाई...एक पर्वणी!