कोरोनाने मानवाच्या मर्यादा स्पष्ट...




    लॉकडाऊनच्या काळात माणसाचं काळीज पिळवटून टाकणारे अनेक प्रसंग मानवावर आले.मुंबईत आता रोजगार नाही,आपल्या कुटुंबाच्या जेवणाचे काय ? आणि मृत्यूची टांगती तलवार डोक्यावर,अशा परिस्थितीत भयभीत झालेले प्ररप्रांतिय कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या काळात मिळेल ते वाहन पकडून गावी निघाले होते.वाहनात गुरढोरांसारखी कोंबलेली माणसे,लहान मुलांना वाहनात चढवताना,आणि मैलो न मैल पायी चालत निघालेले,अशी अनेक हृदयद्रावक दृष्ये,आपण पाहिली.एका छायाचित्राने तर आपण सारे सुन्न झालो.त्या बाळाची  काय चूक आहे ? असा प्रश्न तुमच्या आमच्या मनात नक्कीच उभा राहिला असेल. एवढासा तो जीव त्याला ठाऊक देखील नसेल की आपण कोणत्या परिस्थितीत आहोत.त्याच्या वडिलांनी वाहनात शिरताना त्याला ज्या पद्धतीने वाहनात चढवले,तो प्रकार अमानुष असाच होता.पण बाप तरी काय करणार हो,तो ही असहाय्य होता.कारण त्याला कुटुंबातील प्रत्येकाचा जीव वाचवायचा होता.

वास्तविक सरकार,त्याकाळी फारसे संवेदनशील नव्हते,त्यामुळे परप्रांतीयांचे अतोनात हाल झाले.अनेकांचे जीव गेले,तर लहान मुलांनाही अतोनात त्रास सहन करावा लागला.लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात अनेक मदतीचे हात पुढे आले.राजकीय नेते,उद्योगपती,छोटे मोठे व्यवसायिक,अनेक सामाजिक संस्था,अशा समाजातील विविध घटकांनी आपापल्या परीने जे काही शक्य होईल,ते केले.आजही या संसर्गजन्य आजाराने जगभरात थैमान घातले आहे.लाखो लोकांचे बळी गेले,आजारावर अद्याप लस मिळालेली नाही.त्यामुळे रुग्णाच्या संख्येत दिवसेदिवस वाढत होत आहे.प्रयत्न केल्यास जगात काहीच अशक्य नाही,या उक्तीनुसार,आपण सारे या जीवघेण्या संकटातून नक्कीच बाहेर पडू.पण या लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार,व्यवसाय बुडाले.लाखो कुटुंबे उद्ध्वस्त झाली.हे सारे सुरळीत व स्थिरस्थावर होण्यास किमान पाच वर्षांचा कालावधी लागणार आहे. 

अशी स्थिती आपल्यावर येईल,असे कोणालाच वाटले नाही.विसाव्या शतकात ज्या मानवाने चंद्रावर पाऊल ठेवले व २१ व्या शतकात मंगळावर पाय ठेवण्याचे स्वप्न पाहिले,त्या संपूर्ण मानवजातीला एका सूक्ष्म जिवाणूने त्याची औकात दाखवून दिली आहे.गेले पाच महीने पिंजऱ्यातील पक्षाप्रमाणे आपण,आपल्याच घरात बंदीस्त झालो आहोत.परिस्थिती सुधारत असली तरी मृत्यूचे भय मात्र कायम आहे.लॉकडाऊनमध्ये आता शिथिलता देण्यात आली आहे.प्रत्येकजण हा प्रादुर्भाव कधी आटोक्यात येईल,याची चातकासारखी वाट पाहत आहे. 

मात्र या जिवाणूने मानवाच्या मर्यादा स्पष्ट केल्या,विज्ञानाच्या बळावर मी काहीही करू शकतो,हा मानवाचा अहंकार,या जिवाणूने जमीनदोस्त केला.आजही रेल्वे,शाळा व हॉटेल्स सुरू करणे,शक्य होत नाही,कारण आता समूह संसर्गाची लागण मोठ्या वेगाने सुरू झाली आहे.गावी गेलेले परप्रांतीय मजूर पुन्हा शहरी भागात परतू लागले आहेत,कारण गावी राहून करणार तरी काय ? आणि आता शेतीतही "राम" उरला नाही.त्यामुळे जिवावर उदार होऊन पुन्हा रोजगार मिळेल,या आशेने तो माघारी परततोय...

- रामेश्वरी आहेर

Comments

Popular posts from this blog

पहिल्या शेतकरी आत्महत्येला ३५ वर्षे पूर्ण तरी...

'ती ' ची सत्ता येऊ द्या...

भाई...एक पर्वणी!