" बाप रे बाप"....
अगदी शाळेपासूनच... म्हणजे निबंध लिहून आणा असे आपल्याला सांगितले की योगायोगाने का होईना सगळ्यांचा आवडत ऋतु एकच असायचा तो म्हणजे 'पावसाळा'...पण त्यावेळी पाऊस म्हणजे शाळेला सुट्टी आणि घरी राहून धम्माल करायची बसं एवढंच.. पण आता ? खरं तर पाऊस सगळ्यांनाच हवाहवासा वाटतो, तसाच तो मलाही खुप आवडतो.पण यावेळी पावसाने मात्र कमालच म्हणजे अगदी 'आली लहर केला कहर' याचप्रमाणे...उन्हाळ्यात पावसाची वाट बघून बघून पावसाला शिव्या दिल्या की,'पड ना आता पड.. आता का नाही पडत'..वगैरे सगळं आणि त्यानुसार पावसाने ऐकलं आणि सुरुवात झाली ती एवढी की बाप रे! अगदी सलग तीन-चार दिवस तो काही आता जायचं नावच घेत नव्हता, आणि मलाही खुप कंटाळा आला. कारण चार दिवसांपासून सगळीकडे घडणाऱ्या वाईट घटना, पाणी साठलेले, कॉलेज बंद, त्यामुळे कुठे जाण्याची सोय नाही. त्यात मी राहते पालघर ला ..मित्रांच्या म्हणण्यानुसार गावालाच,इथून आधीच ट्रेन कमी, त्यात पावसाने अस थैमान घातले की त्यामुळे आहे नाही त्या पण ट्रेन बंद झाल्या आणि चक्क सलग चार दिवस मी घरीच..
त्यात मी एक गंमत केली... गाडीमध्ये पेट्रोल टाकण्याच्या कारणाने गाडी घेऊन घराबाहेर पडले आणि पाऊस तेव्हाही बऱ्यापैकी चालुच होता. मग काय? गाडी-पाऊस-मी असे छानसे त्रिकुट जमले आणि मनसोक्त पावसात गाडी चालवण्याची जी मजा घेतली ना ती काही औरच...म्हणजे व्वा.. तो क्षण मी मला हवा तसा जगले अगदी मनापासून, मग खूप वेळ झाल्यानंतर घराकडे वाट धरली आणि चिंब भिजून घरी आले. आल्या आल्या आईचं वाक्य 'भिजून आलात आजारी पडू नका म्हणजे झालं' ..आता शेवटी ती आईच आपल्याला पूर्ण ओळखणारी.. झालं रात्री ज्या शिंका चालू झाल्या आणि सर्दी तापला सुरुवात झाली. मग गोळया औषध चालू..
पण हा सगळा गमतीचा भाग झाला. या सगळ्याबरोबर मनात एक गोष्ट कायम चालूच होती, की बरयाच ठिकाणी पाणी भरलंय, रस्ते-ट्रेन बंद, त्या ठिकाणी अडकलेले माणसे कसं स्वतःला बाहेर काढतील, कसं घरी जातील. म्हणजे मी विचारही करू शकत नाही त्या पलीकडे अजून काही अडचणी असतील. अशा वेळी वाटत आपल्याकडे येणारा पाऊस विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी पडावा.
पण निसर्गापुढे कोणाचे काहीच चालत नाही...चार दिवस थैमान घालून गेलेला पाऊस अखेर विसावला व दैनंदिन कामे सुरळीत पणे हळूहळू का होईना मार्गी लागले.
- रामेश्वरी आहेर

Comments
Post a Comment