आजची स्त्री....


     ८ मार्च हा दिवस जगभरात जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. २ फेब्रुवारी १९०९ रोजी न्यूयाॅर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला, तरी  १९१० च्या आंतरराष्र्टीय महिला परिषदेत मांडलेल्या सुचनेनुसार ८ मार्च हा महिला दिन म्हणून जाहीर झाला.


     पिढ्यान पिढ्या चालत आलेले चूल  व मूल या संकल्पनेतुन बाहेर येत महिलांनी ४ दशकांपूर्वी घराचा उंबरठा ओलांडला, ते स्वत:ला सिध्द करण्यासाठीच. तिच्या डोक्यावर संसाराची  घागर असते ....प्रत्येकीच्या घागरीत सुख-दुःख,काबाडकष्ट,ओढाताण  ओतप्रोतअसते, त्याचा तोल सांभाळतच तिला आयुष्याची वाटचाल करायची असते. विचारांची,जाणीवांची, जबाबदारीची संवेदना आणि सासर-माहेरचा समतोल ठेवूनच तिला आपली वाटचाल करायची असते. ते ही  ताठ मानेने व चेहर्‍यावर  खरं किंवा उसनं हसू ठेवतंच.

पायी काटे, डोईवर रणरणतं उन...
तरीही ती राबतच आहे.
युगानूयुगे.....
तन मन थकले तरी ...
कर्तव्य तीचे चालूच आहे....
तरीही ....
पाणी आणि घागरीचा तोल ती यशस्वीपणे सांभाळत आली आहे....

     एकोणीसाव्या शतकात मात्र  स्त्रीवादी चळवळीने जोर धरला, भारतातील समाजसुधारकांनी स्त्रीयांवर होणार्‍या अन्यायाला वाचा फोडली, समाजातील अनेक अनिष्ट प्रथा बंद केल्या. महिलांच्या उत्थानासाठी नवनविन विषय समाजासमोर आणण्यात आले. प्रस्थापित समाजाचा प्रचंड विरोध सहन करत फुले दाम्पत्यांनी महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाचा श्रीगणेशा केला.कालांतराने महिला सामाजिक,राजकीय ,शैक्षणिक व इतर विषयावर आपले मत मांडू लागल्या. तिच्या डोक्यावर अनेक बंधनाचे जोखड असतानाही ती रणरागिणी झाली.अहिल्या, जिजाऊ, सावित्री, मुक्ताई, जनाई, मीराबाई सारख्या संत जन्माला आल्या.


     राजेशाही नष्ट होऊन लोकशाही आली, संविधानाने सर्वांना समान हक्क दिला म्हणून आजची स्त्री कित्येक स्तरावर आपले हक्क व अधिकार गाजवू शकत आहे.बदलत्या परिस्थितीत मात्र स्त्रीची भूमिका बदलत चालली आहे.आरक्षणामूळे तिचा सर्व क्षेत्रात मुक्त वावर सुरू झाला आहे.ती मुलगी,सून,पत्नी,माता ह्या भूमिकांव्यतिरिक्त सरपंच, नगरसेविका,महापौर,आमदार असो वा खासदार,अधिकारी, वैज्ञानिक, जिल्हाधिकारी, तलाठी, तहसीलदार, शिक्षिका, डाॅक्टर,पञकार, पोलिस, वकील, वैमानिक, रिक्षाचालक, खेळाडू, सामाजिक, उद्योग, कलाक्षेञ अशा विविध क्षेञात यशस्वी होत आपल्या बुद्धीला,आत्मसन्मानाला तिने नवीन दिशा दिली आहे. आजच्या जगात असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे स्त्रीचा सहभाग नाही. प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने ती विविध क्षेत्रात आपले कर्तृत्व गाजवत आहे.

 
     देशभरात बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण झालं. घरबसल्या महिलांना उद्योग मिळाला आणि आर्थिक सुबत्ता आली. कित्येक महिला यशस्वी उद्योजिका म्हणून नावारूपाला आल्या तर कित्येक महिलांनी  राजकारणात सक्रिय होवून लोकसभा सभापती, पंतप्रधान, मुख्यमंत्री,ते राष्ट्रपती  असा सर्वोच्च पदभार यशस्वीरीत्या सांभाळला आहे. तिच्या जीवनाला अनेक पैलू लाभले व  त्यास आपल्या कर्तृत्वानेअधिक चमक तिने  दिली आहे. एकविसाव्या शतकातील स्त्रीचं हेच यशोगान आहे.


    एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करत असताना सर्व क्षेत्रात महिलांनी स्वत:ला सिध्द केल्याचं दिसत आहे. अनेक महिला आज समाजातील अनिष्ट प्रथा कायमच्या बंद व्हाव्यात,म्हणून लढत आहेत.या कार्यातही त्या यशस्वी ठरत असून येणाऱ्या काळात समाजात अनेक बदल आपल्याला नक्कीच पहावयास मिळतील. आरक्षण व महिलांचे धाडस या दोन कारणामुळे २१ व्या शतकात स्त्रीला समानतेचा अधिकार प्राप्त झाला. प्रतिभाताई पाटील, कल्पना चावला, सानिया मिर्झा, पी.टी.उषा, सुमित्रा महाजन, वसुंधराराजे, ममता बॅनर्जी व जयललिता अशा कित्येक महिलांनी आपापल्या क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी बजावली.जुनाट तसेच प्रस्थापित व्यवस्थेची बंधने झिडकारून महिला 'अबलानारी' नाही हे जगाला दाखवून दिले.ह्या सर्व गोष्टींचा विचार केला तर असे वाटते की, स्त्रीला योग्य तो सन्मान मिळाला आहे, परंतु महिलांनी अधिक सक्षम व्हायला हवे. स्त्री ही एक शक्ती आहे ती  सर्व आव्हाने स्विकारून पून्हा तिने नवा इतिहास घडवण्याच्या दृष्टीने अधिक जोमाने कामाला लागायला हवे,तसे झाल्यास समाजपरिवर्तन होण्यास अधिक काळ प्रतीक्षा करावी लागणार नाही आणि खर्‍या अर्थाने  महिला दिन साजरा होईल.


- रामेश्वरी आहेर

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

पहिल्या शेतकरी आत्महत्येला ३५ वर्षे पूर्ण तरी...

'ती ' ची सत्ता येऊ द्या...

भाई...एक पर्वणी!