भाई...एक पर्वणी!

       

    पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच पु.ल. देशपांडे ऊर्फ “भाई”. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व मराठी साहित्याला अजरामर करणारा एक लेखक, नाटककार, नट, कथाकार व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक प्रत्येक क्षेत्रातील त्यांचे विस्तीर्ण ज्ञान, अनुभव जीवनाबद्दल आस्था, आत्मीयता हृदयाला स्पर्श करणारी आहे. म्हणूनच पु. लं यांच्या साहित्यातील वाचकाचा प्रवास सुध्दा सुखकर व अल्लाहदायक आहे. शाळेत तसेच भावंडांसाठी छोटी नाटुकली लिहून देणे सेवादलाच्या पथकांसाठी कार्यक्रम लिहून देणे येथूनच त्यांच्या लेखणीला खरी सुरुवात झाली. १९३७ पासून छोट्या-मोठ्या नाटकात भाग घ्यायला त्यांनी सुरुवात केली होती. त्याच वर्षी त्यांनी अनंत काणेटकरांच्या पैजार या श्रुतिकेत काम केले. यानंतर हळूहळू आपल्या लिखाणातून, हजरजबाबीपणा यातून लोकांचे मन जिंकले. १९४४ साली पु.लं यांचे  व्यक्तिचित्रण (नागपूरकर) अभिरूची या नियतकालिकातून प्रसिद्ध झाले होते. १९४७ ते १९५६ हा त्यांच्या चित्रपटात पदार्पणाचा काळ होता. 'वंदे मातरम',  'दूध-भात', 'गुळाचा गणपती' या चित्रपटातून त्यांनी अष्टपैलू भूमिका साकारल्या होत्या. पुढे 'देव बाप्पा' हा त्यांचा चित्रपट खूप प्रसिद्ध झाला व त्यातील 'नाचरे मोरा' हे गाणं आजही प्रत्येक लहान मुलांच्या तोंडी आपण ऐकतो. आपल्या प्रत्येकाचे बालपण हे गाणे ऐकूनच गेले आहे.


     २६ जानेवारी १९५७ ला 'तुज आहे तुजपाशी' या त्यांच्या सामाजिक नाटकाचा पहिला प्रयोग झाला.यातून त्यांच्यातील दमदार लेखक जनमानसात दृढ झाला. पुढे त्याच वर्षी 'सारं कसं शांत शांत', 'सदू आणि दादू', 'मोठे मासे-छोटे मासे' या एकांकिकांना भरघोस दाद मिळाली. पु.ल. देशपांडे या नावाला मराठी साहित्यात वजन प्राप्त झाले, व ते वाढतच गेले. पु.लंच्या साहित्याची जादू आहे. त्यांचे साहित्य वाचायला घेतले की मन आतल्या आत हसायला लागते. व गालातल्या गालात हसता हसता आपण एक-एक पान उलटतो. 'असा मी असामी', 'अपूर्वाई', 'ती फुलराणी', 'व्यक्ती आणि वल्ली' ही त्यांची प्रसिद्ध पुस्तकांपैकी काही उदाहरणे. पु.लंच्या साहित्यात जीवन दृष्टी देणारी प्रवासवर्णने मार्गदर्शन आहेत. त्यांच्यामुळे खूपच दूरचे देश मराठी माणसांशी जवळीक साधून गेले. 

 
       २०१९ हे पु.लंचे म्हणजेच आपल्या भाईंचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने त्यांच्याबद्दल आपले प्रेम व्यक्त  करण्याकरिता त्यांच्या जीवनावर आधारित मराठी सिनेमा काढण्यात आला. त्याच नाव 'भाई व्यक्ति की वल्ली' असे आहे. या चित्रपटातून त्यांचा जीवनप्रवास दाखविण्यात आला.  पु.लं साहित्य नाटकातील योगदान ते उतारवयातील पु.ल.यांचा असा प्रवास दाखवण्याकरिता  उत्तरार्ध देखील प्रदर्शित होणार आहे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात भाईंचे वेगळे स्थान आहे. पु.ल यांना त्यांच्या जीवन प्रवासात जे काही उत्कृष्ट भव्य त्यांना दिसलं जाणवलं ते त्यांनी मराठी माणसांपर्यंत पोहोचवल. मराठी माणसांसाठी वर्षानुवर्षे पुरेल इतके साहित्य त्यांनी निर्माण करून ठेवले आहे.


- रामेश्वरी आहेर

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

पहिल्या शेतकरी आत्महत्येला ३५ वर्षे पूर्ण तरी...

'ती ' ची सत्ता येऊ द्या...