पत्रकार दिन


                                           
         लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ ज्याला आपण म्हणतो तो म्हणजे पत्रकार, दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून सगळीकडे साजरा केला जातो.आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी ६जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे वृत्तपत्र आवर्जुन मराठी भाषेत काढण्यात आले.वर्षानुवर्षे पत्रकार स्वतःला झोकून देऊन या क्षेत्रात काम करत आला आहे. सुरुवातीच्या काळात केली जाणारी पत्रकारिता ही एखाद्या विशिष्ट हेतूने केली जात असे.तसेच शोधपत्रकारिता हे स्वरूप त्यावेळी होते. लोकांना न्याय मिळवून देण्याकरिता अनेक पत्रकारांनी स्वतःचे घर-कुटुंब याकडे दुर्लक्ष करून, तसेच अनेक गोष्टींचा त्याग करून पत्रकारिता केले. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, बाळशास्त्री जांभेकर, अनंत भालेराव, गोविंद तळवळकर या सगळयांनीच समाज प्रबोधन करण्यासाठी समाजाला योग्य मार्गावर आणण्याचे कार्य केले.


      समाजात बदल घडून यावा,अन्यायाला वाचा फोडावी याकरिता अनेक लोकांनी या क्षेत्रात येण्याचे धाडस केले.पत्रकाराने आपल्या भविष्याची काळाची, चिंता, भय हे देशाच्या चरणी अर्पण करून आपलं लिखाण देशहितासाठी करत आले आहे. मात्र, हळूहळू यासाऱ्या गोष्टी बदलू लागल्या. आज अशी परिस्थिती आली आहे की लोकशाहीचा चौथा स्तंभच पोखरला गेला आहे. लोकांना न्याय देणारा पत्रकार आज त्यालाच स्वतःच्या हक्कासाठी, न्यायासाठी लढावे लागते आहे.महाराष्ट्रात अनेक नेते पत्रकार दिन यादिवशी पत्रकारांचा सत्कार करतात, कार्यक्रम आयोजित करतात. मात्र पत्रकारांना देखील सत्काराची नव्हे तर न्यायाची अपेक्षा आहे.पत्रकारांच्या प्रलंबित मागण्या मान्य होऊन त्याची अंमलबजावणी झाली तर खऱ्या अर्थाने पत्रकारांना न्याय मिळेल व त्यांचा सत्कार ठरेल.

 
       महाराष्ट्रात अनेक असे पत्रकार आहे ज्यांची शासन दरबारी नोंदच नाही किंवा ९०टक्के पत्रकारांना अधिस्वीकृती मिळालेली नाही. याकडे वारंवार दुर्लक्ष होत आलेले आहे.एका वाईट किंवा एका भ्रष्ट पत्रकारामुळे सर्वच पत्रकारांना भ्रष्ट समजले जाते. मात्र खरी पत्रकारिता करणारा, सत्य समोर आणण्यासाठी समाजात जागाच नाही असे दृश्य दिसून येते.देशात उजव्या विचारांच्या राजकारणाच्या विरोधात बोलणाऱ्या आणि लिहिणाऱ्या विचारवंतांच्या हत्यांचे  सत्र चालू आहे.याचे उदाहरण म्हणजे गौरी लंकेश असे पत्रकार आपण गमावतो आहे.मात्र असे कृत्य करणारा गुन्हेगार समाजात खुलेआम वावरतो व पुन्हा तेच दृश्य समोर येते , न्याय मात्र मिळतच नाही. हे चक्र कुठे तरी थांबायला हवं. यासाठी शासनाने पत्रकाराला केवळ बोलण्यासाठी लोकशाहीचा चौथा स्तंभ न म्हणता किंवा  तसे राहू न देता. खरचं आज त्याला भक्कम करण्याची वेळ आली आहे.


        नवीन पिढी या क्षेत्राकडे व्यावसायिक दृष्ट्या न बघता समाजात बदल करण्याचा दृष्टिकोन ठेऊन पाऊल टाकेल असा बदल होणे आवश्यक आहे.आजची पत्रकारिता व त्याचे स्वरूप देखील बदललेले दिसून येते. ते जाहिरातींनी व्यापलेले आहे. तसेच चॅनलची स्पर्धा एकीकडे तर वृत्तपत्राच्या पुरवण्याची स्पर्धा एकीकडे, वाढत्या सोशल मीडियाचा वापर, त्याचा परिणाम, तंत्रज्ञानाचा विकास व त्याचा उपयोग आपल्याला होताना दिसतात. पत्रकाराला प्रत्यक्ष स्थळी न जाता मोबाईलचा वापर करून जागेवरच बातमी मिळवता येते. ज्या कामाला सुरुवातीला वेळ लागत असे, तेच काम आज काही क्षणात करणे शक्य होते व पत्रकार घडलेल्या घटना जनतेसमोर आणू शकतो.या तंत्रज्ञानाचा योग्य वापर होणे गरजेचे आहे.यावरही अफवांचे प्रमाण होत असल्याने सत्य, असत्य जाणून घेऊन काम करावे.

    याचप्रमाणे आजची पत्रकारिता ही किती निर्भीडपणे काम करते यापेक्षा कोणाच्या दबावाखाली आहे? याचा शोध घेणे महत्त्वाचे आहे. ‘ पेड न्यूज’ ही पद्धत सुरू झाल्यापासून अनेकदा खरी पत्रकारिता पडद्याआड राहते, ते बंद झाले पाहिजे. जो पर्यंत हे बंद होत नाही, तोपर्यंत पत्रकाराला सन्मान मिळणार नाही व न्याय मिळणार नाही.


- रामेश्वरी आहेर

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

पहिल्या शेतकरी आत्महत्येला ३५ वर्षे पूर्ण तरी...

'ती ' ची सत्ता येऊ द्या...

भाई...एक पर्वणी!